भिवंडी: कापडनिर्मिती उद्योगाला संजीवनी देण्यासाठी शासन दरबारी सर्वोतोपरी प्रयत्न करणार- आ.रईस शेख


भिवंडी :  शहरातील कापडनिर्मिती यंत्रमाग उद्योगातील अडचणी सोडवून पुनश्चः यंत्रमाग उद्योग दमाने उभा रहावा याकरिता आ.रईस शेख यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची मंत्रालयामध्ये भेट घेवून यंत्रमाग व्यवसायाची कैफियत मांडली.शेती उद्योगानंतर सर्वांत महत्वाचा उद्योग हा कापडनिर्मिती उद्योग म्हणजेच पावरलूम आहे.सन १९३० पासून हातमाग आणि यंत्रमाग कापड तयार करण्याच्या व्यवसायासाठी भिवंडी हे शहर प्रसिध्द आहे.भारतातील एकूण २१ लाख यंत्रमागापैकी एकट्या भिवंडी शहरामध्ये सुमारे ७ लाख पावरलूम कार्यरत आहेत.देशामध्ये कापडनिर्मिती उद्योगाकरिता भिवंडी हे शहर पूर्वी प्रथम तर आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.त्यामुळेच भिवंडीला पावरलूम सिटी संबोधिले जाते.

या व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत निरनिराळ्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित व अस्थलांतरीत कामगार- मजूर हे भिवंडी शहरामध्ये रोजी रोटीसाठी येऊन राहत आहेत.परंतू गेल्या १० वर्षांतील शासनाच्या उदासीन आर्थिक धोरणांमुळे तसेच निर्यात घसरणीमुळे या कापडनिर्मितीच्या व्यवसायाचे फारच मोठे नुकसान झालेले आहे.त्यामुळे तब्बल २० लाख कामगार आणि पर्यायाने कुटुंबांचा रोजगार धोक्यात आला आहे.त्यामुळे एकूणच भिवंडी व पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि भारत देशाची कापड निर्मितीद्वारे होणारी अर्थव्यवस्था देखील संकटात असल्याचे मत आ.रईस शेख यांनी यावेळी विशद केली.

सोबतच यंत्रमाग धारकांद्वारे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांना वस्त्रोद्योग मागण्यांचे निवेदन देखील सादर करण्यात आले. यामध्ये १२-२४ असलेल्या यंत्रमाग धारक मालकांना राज्य शासनामार्फत आर्थिक तरतूदिकारिता कार्यवाही करणे,यंत्रमाग उद्योगाची परिस्थिती पाहता किमान लॉकडाऊन काळातील वीज बिलामध्ये सवलत मिळणे, यार्नचे भाव स्थिर ठेवणे, भिवंडी मध्ये “कापड मार्केट तसेच यार्न मार्केट” निर्माण करणे, TUF योजनेअंतर्गत रिपेअर लूम लावलेले यंत्रमागधारकांचे कर्जावरील व्याजास सवलत तसेच भिवंडीमध्ये टेक्सटाईल पार्क निर्माण करण्याबाबत मागण्या करण्यात आल्या आहेत. 

त्याचप्रमाणे केंद्र शासनाद्वारे यंत्रमाग उद्योगाला चालना मिळावी म्हणून आखण्यात आलेल्या योजनेमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत देखील चर्चा करण्यात आली.त्यावर वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी मागण्यांबाबत सकारात्मकतेने कार्यवाही करण्याचे आश्वासित केले तसेच केंद्र शासनाच्या योजनेमध्ये झालेल्या घोटाळ्याची येत्या दहा दिवसांत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.येत्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये शहरातील वस्त्रोद्योगच्या सर्वेक्षणासाठी दौरा आयोजित करण्याचे आश्वासित केले आहे.या बैठकीप्रसंगी प्रधान सचिव, वस्त्रोद्योग विभाग, संचालक व उपसंचालिका व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील यंत्रमाग धारक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...