राष्ट्रप्रथम आणि राष्ट्रकार्य हीच भाजपा व संघ परिवाराची सर्वोच्च भावना- माजी आमदार नरेंद्र पवार
कल्याण : आपला परिवार म्हणजे कौटुंबिक नाही तर हे राष्ट्र म्हणजेच एक परिवार आहे. भाजपाचा कार्यकर्ता हा राष्ट्रकार्याला समर्पित होऊन काम करतो. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो तरीही राष्ट्रप्रथम आणि राष्ट्रकार्य हाच आपला मूळ विचार असल्याचे मत माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी, कल्याण जिल्हा आयोजित कल्याण पूर्व व श्रीमलंग मंडलाचा प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. दरम्यान आपला विचार परिवार या विषयावर माजी आमदार नरेंद्र पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश हे एक शिस्तबद्ध आणि समर्पित स्वयंसेवकाचे प्रमाण आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वव्यापी होऊन केवळ संघ स्वयंसेवक कार्यरत असतो, त्यामध्ये भाजपा राजकीय क्षेत्रात काम करणारा एक घटक आहे. परिवारात व्यक्तिपूजेला थारा नाही, संघाची प्रार्थना ही राष्ट्र उन्नतीची आहे आणि संघाचा गुरू हा भगवा ध्वज आहे. आपणही आपल्या सार्वजनिक जीवनात व्यक्तिपूजेला महत्व न देता राष्ट्रासाठी काम केले पाहिजे.
राजकारणात नगरसेवक, आमदार खासदार, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान अशी मोठी मोठी पदे ही समाजसेवेसाठी संधी म्हणून वापरली पाहिजेत. एकेकाळी "सोने की चिडीया" असणाऱ्या देशाची आजची स्थिती पाहिली तर अवघा समाजाने भारत पुनर्निर्माणासाठी काम केले पाहिजे असेही मत माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा अध्यक्ष विजय उपाध्याय, जिल्हा उपाध्यक्ष नाना सुर्यवंशी, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी, नगरसेवक विकी तरे, नगरसेवक मनोज राय, इतर नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.