कोरोना काळात कल्याण डोंबिवलीत खासगी डॉक्टरांनी दिलेलं योगदान खूप मोठं - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
कल्याण : देशाच्या कोणत्याही शहरात जे काम झालं नाही ते कल्याण डोंबिवलीमध्ये खासगी डॉक्टरांनी इकडे करून दाखवले आहे. कोरोना काळात कल्याण डॉक्टर आर्मीच्या माध्यमातून खासगी डॉक्टरांनी खूप मोठं योगदान दिल्याचे गौरवोद्गार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काढले. इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणतर्फे रक्तदान शिबिर आणि कोवीड काळात उल्लेखनीय सेवा दिलेल्या डॉक्टर आर्मीच्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही कौतुकाची थाप दिली.
कल्याण डोंबिवलीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या आयएमए, नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन, कल्याण ईस्ट मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, आयुर्वेद व्यासपीठ, होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशन, युनानी आदी संघटना कल्याण डॉक्टर आर्मीच्या एका छताखाली एकत्र आल्या. या खासगी डॉक्टरांनी कोणतेही मानधन न घेता, वैयक्तीक अपेक्षा न ठेवता आणि विशेष म्हणजे कोवीडच्या पहिल्या दिवसापासून आपल्या जीवाची पर्वा न करता कल्याण डोंबिवलीमध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्यानेच इथला मृत्युदर संपूर्ण राज्यात सर्वात कमी राहिल्याचे खासदार डॉ.शिंदे यांनी सांगितले.
तर कोवीड काळात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तुटपुंज्या मनुष्यबळाला कल्याण डॉक्टर आर्मीने दिलेल्या सहकार्यामुळे इकडे कोवीड नियंत्रणात येऊ शकला. कोवीड काळात निर्माण झालेली ही डॉक्टर आर्मी यापुढेही कोणत्याही संकटात अशाच प्रकारे केडीएमसीच्या पाठीशी उभी राहो अशी अपेक्षा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
यावेळी कोवीड काळात उल्लेखनीय योगदान दिलेल्या कल्याण आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील कोवीड टास्क फोर्सचे डॉ. विक्रम जैन, डॉ. अमित बोटकुंडले, डॉ. राजेंद्र केसरवानी या प्रमूख कोवीड वॉरियरसह डॉ. श्रेयस गोडबोले, डॉ. हिमांशू ठक्कर, डॉ. अमित सिंग, डॉ. संदेश रोठे, डॉ. स्नेहलता कुरिस आदी आयएमए, केम्पा, नीमा, होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानी विभागातील तब्बल २०० डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे, भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पवार, आयएमए कल्याणच्या डॉ. ईशा पानसरे, डॉ. सुरेखा इटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.