"शेती टिकवण्यासाठी मातीची काळजी आवश्यक" - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने
मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा पार पडली.
बदलापूर: शेती टिकवायची असे तर मातीची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केले. कोकणात खरीप हंगामात भात हे मुख्य पीक आहे. शेतकरी भातात मुख्यत्वे युरिया चा वापर करतात. इतर अन्न द्रव्यांचा वापर न केल्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जमीन सुपीकता निर्देशांक नुसारच जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी सेंद्रिय खताचा व उत्पादन वाढीसाठी रासायनिक खताचा वापर करावा. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल व जमिनीची प्रत ही सुधारेल असेही अंकुश माने यांनी यावेळी सांगितले. मृदा दिना निमित्त अंबरनाथ तालुक्यातील येवे येथे आयोजित केलेल्या शेतकरी कार्यशाळेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन केले. यावेळी येवे गावातील "कृषी वार्ता फलका"चे अनावरण करण्यात आले.
"एक गाव एक संदेश" या उपक्रमांतर्गत गावातल्या प्रत्येक घरातील फोन नंबर घेवून ब्रॉड कास्ट लिस्ट च्या मध्यामतून कृषी संदेश गावातील प्रत्येक घरात पोहचविण्याचा कृषी सहायक सचिन तोरवे यांच्या संकल्पनेतील नावीन्यपूर्ण उपक्रमाचे अंकुश माने यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कृषी विभागामार्फत रब्बी हंगामासाठी देण्यात येणाऱ्या हरभरा बियाणाचे शेतकऱ्यांना यावेळी वाटप करण्यात आले."विकेलं ते पिकेल" योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे गट तयार करणे, शेतकऱ्याना शेतमाल उत्पादन करण्यासाठी तंत्रज्ञान, यांत्रिकिकरण, कृषी प्रक्रिया करणे व शेतमालाची थेट विक्री करणे यासाठी शासनाने प्रकल्प तयार केले असून शेतकऱ्यांनी या योजने अंतर्गत लाभ घ्यावा असे आवाहन अंकुश माने यांनी यांनी यावेळी केले.
जमिनीतील घटक, त्यांचे महत्व व माती तपासणी अहवाल नुसार खताची मात्रा काढणे या बाबत जिल्हा मृद सर्वेक्षण अधिकारी बाळासाहेब माने यांनी आपल्या मनोगतात सविस्तर माहिती दिली. आपल्या जमिनीत माती परीक्षणानुसार खत वापर केल्यामुळे मागील वर्षी २६क्विंटल उत्पादन येणाऱ्या जमिनीत ह्या वर्षी ३४ क्विंटल उत्पादन झाल्याचे मनोज देशमुख यांनी यावेळी सांगितले. तालुका कृषी अधिकारी विठ्ठल बांबळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. आभार प्रदर्शन सुवर्णा माळी यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश वडते यांनी केले. कार्यक्रम आयोजनासाठी मदन भोईर, नितीन घागस, दौलत देशमुख ग्रामस्थ व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.