उल्हासनगरातील अवैध धंद्यांवर ४८ तासात धडक कारवाई,
पोलीस उपायुक्तांचे भाजपाला आश्वासन
उल्हासनगर : येणाऱ्या ४८ तासात उल्हासनगरातील सर्व अवैध धंद्यांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार असे आश्वासन पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी भाजपाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.शहरात चरस,गांजा,अफीम आदी अमली पदार्थ,मटका,जुगार,क्रिकेट बेटिंग,देहव्यापार,हुक्कापार्लर आदी अवैध धंदे कोणकोणत्या ठिकाणी सुरू आहेत त्या स्पॉटची माहिती भाजपाच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्याकडे सोपवली आहे.त्यात ऑर्केस्ट्रा बारला रात्री साडे अकरा पर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे.मात्र हे बार राजरोसपणे मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत सुरू राहत असून या बारची नावे निवेदनात नमूद करण्यात आली आहेत.
पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची भेट घेण्यात आलेल्या शिष्टमंडळात आमदार कुमार आयलानी,जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी,विरोधी पक्षनेता किशोर वनवारी,माजी स्थायी समिती सभापती राजेश वधारिया,नगरसेवक-प्रवक्ते मनोज लासी,टोनी सीरवानी,शेरी लुंड,प्रदीप रामचंदानी,गजानन शेळके,माजी नगरसेवक पी.एस.आहूजा यांचा समावेश आहे.४८ तासात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येणार असे आश्वासन उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिले आहे.कोणकोणत्या धंद्यांवर कारवाई झाली त्याची माहिती देण्यात यावी अशी विनंती त्यांना करण्यात आल्याचे प्रवक्ते मनोज लासी यांनी सांगितले.