एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करावी: एकनाथ शिंदे
ठाणे : सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली तयार करण्यात आली असून सामान्य माणसाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे हा ध्यास यामागे आहे. नियम चांगले असले तरी त्याची अंमलबजावणीही तितक्याच काटेकोर आणि प्रभावीपणे झाली पाहिजे असं प्रतिपादन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. राज्य शासनानं मंजूर केलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली संदर्भात एका तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही नियमावली समजून घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
दीडशे चौरस मीटर पर्यंतच्या भूखंडावर स्व वापरासाठी घर बांधणा-या व्यक्तीला बांधकाम परवान्याची आवश्यकता यामध्ये रद्द करण्यात आली आहे. हौसिंग स्टॉक वाढत असतानाच नगर नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. ही नियमावली म्हणजे बांधकामासाठीची नियमावली नसून शहराच्या शिस्तबध्द विकासाच्या नियोजनाचे ते महत्वपूर्ण साधन आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. प्रत्येक शहरासाठी स्वतंत्र नियमावली ऐवजी अवघा महाराष्ट्र एकाच पुस्तकात आणल्याबद्दल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नगरविकास मंत्र्यांचे कौतुक केलं.