भिवंडीत युनियन बँक ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी उतरली रस्त्यावर
पदचाऱ्यांशी संवाद साधून सहज उपलब्ध करून देणार सेवा
भिवंडी : कोरोना काळात असंख्य उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक घडी विस्कटलेली असताना बँका व बँक अधिकारी कर्मचारी अशा परिस्थितीत ही जनतेला सेवा देऊन आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी झटत होते.त्यांच्या तळमळीतूनच ग्राहकांच्या सेवेकरीता फिट ऑन स्ट्रीट ही योजना सुरु करीत असून यामध्ये बँकेचे विक्री अधिकारी रस्त्यावर उतरून नागरीकांना विविध योजनांची माहिती देणार आहेत अशी माहिती मुंबई विभागीय मुख्य व्यवस्थापक व्यंकटेश मंचाल यांनी सांगितले.ते भिवंडी बँक कार्यालयात फिट व स्ट्रीट या योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी ठाणे विभागीय व्यवस्थापक रेणू नायर ,उपव्यवस्थापक राजकुमार,डी.संदीप ,शाखाधिकारी दीप अमर , मीरा कॉटनचे जयेश शहा ,बॉम्बेवाला ज्वेलर्सचे प्रदीप राका आदींसह असंख्य ग्राहक उपस्थित होते. कोरोना काळात सर्व घरी बसले असताना बँक कर्मचारी सर्वाना सेवा देत होते.त्यांच्या घरी सुध्दा वयोवृद्ध ,लहान बालक असताना त्यांनी हे काम केले त्यांच्या मनात सुध्दा भीती होती पण सेवा महत्वाची होती ते कर्तव्य आम्ही पार पाडले.मोठे व्यावसायिक ,रस्त्यावरील फेरीवाले सर्वच व्यवहार ठप्प असल्याने आर्थिक तंगीमुळे वैतागलेले होते.कित्येकांना घरी जाऊन सेवा देत मुंबई विभागात तब्बल ५० हजार बचत तर ३ हजार चालू खाते सुरू केले असून कर्ज,युनियन सुविधा ,खाते सुरू करणे,युनियन प्रोग्रेस योजना यांसह सहा सेवा पुरविणार असल्याचे शेवटी व्यंकटेश मंचाल यांनी सांगितले.
ग्राहकांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून सेवा देत असल्याने बँकेप्रती ग्राहकांमध्ये चांगला संदेश जात आहे.कोरोना काळात ही बँकेने चांगल्या सेवा ग्राहकांना दिल्याने नागरीकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात बँक कर्मचारी ,अधिकारी यशस्वी झाले आहेत अशी प्रशंसा बँक ग्राहक जयेश शहा यांनी केली . या कार्यक्रमाच्या प्रारंभी योजनेचा फलक ध्वज अनावरण करून शुभारंभ करण्यात आला तर कर्ज मंजूर झालेल्या ग्राहकांना त्याबाबतचे पत्र मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले.